शिवप्रेमी उत्सव मंडळ सांगोला यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

काल सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. एकच जल्लोष उत्साह पहायला मिळाला. मिरवणुका, पारंपरिक वेशभूषा यामुळे परिसर शिवमय झालेला दिसून आला. सांगोला तालुक्यातही मोठा उत्साह पहायला मिळाला.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणा देत, सांगोला शहर आणि तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी या दृष्टीने शिवप्रेमी उत्सव मंडळ सांगोला यांच्या वतीने मोठे जंगी नियोजन करण्यात आले आहे . त्यानुसार विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल बुधवारी पहाटे ६ वाजता अण्णासाहेब मेटकरी यांच्या हस्ते दुग्ध अभिषेक करण्यात आला. यासह संस्कार शितोळे यांची भव्य दिव्य अशी रांगोळी काढण्यात आली.

त्यानंतर शिवकन्या यांनी शिवपाळणा गायला. त्यानंतर सांगोला शहर व तालुक्यातील विविध खेळाडूंनी आपले व आपल्या गावचे नाव राज्याने राज्याबाहेर पोहोचवले अशा खेळाडूंचा शिवप्रेमी मंडळांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. शिवप्रेमी मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या पारंपारिक वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख, मा. आम. शहाजीबापू पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, तहसीलदार संतोष कणसे, मुख्याधिकारी सुधीर गवळी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, युवा नेते यशराजे साळुंखे पाटील यांच्यासह यावेळी विविध राजकीय सामाजिक पक्षाचे पदाधिकारी, डॉक्टर ,पत्रकार, उद्योजक, वकील मंडळी, तसेच सांगोला तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला शहर व तालुक्यातील विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पवृष्टी अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रा दरम्यान शहरातील सर्व महापुरुष यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करात शहरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी सजीव देखावा करण्यात आला होता. विशेष आकर्षण म्हणून, घोडे, हालगी, नाशिक ढोल, उंट, मावळे, सबिना, मल्लखांब, दांडपट्टा आदी समावेश होते. या पदयात्रेमध्ये तरुण व महिलांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केल्या होत्या यामुळे या पदयात्रेस ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमी मंडळ यांच्याकडून काढण्यात आलेल्या पद यात्रेला मोठ्या प्रमाणात शिवकन्या व शिवप्रेमींनी गर्दी केली होती. या पदयात्रेचे मुस्लिम समाज बांधव, बौद्ध बांधव, लिंगायत बांधव यासह विविध सामाजिक संघटनेकडून मोठ्या उत्साहात उत्साहात स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीची सांगता होत असताना, शिवप्रेमी मंडळाकडून उपस्थित सर्व शिवप्रेमी यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सदानंद मल्टीपर्पज हॉल चे सचिन गव्हाणे, डॉक्टर पांडुरंग गव्हाणे, ओंकार केदार, यल्लाप्पा निंबाळकर, योगेश कदम यांनी सदरची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिवप्रेमी मंडळ यांच्यावतीने विशेष परिश्रम घेतले.