कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना गनिमी काव्याने घेराओ घालण्यासाठी आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनाच शुक्रवारी पोलिसांनी घेराओ घालून ताब्यात घेतले.यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. झटापट आणि धक्काबुक्कीही झाली; परंतु पोलिसांनी कार्यकर्त्यांचा विरोध मोडून काढून त्यांना ताब्यात घेतले. पोलिस व्हॅनमध्ये घालून पोलीस मुख्यालयाकडे नेले. यावेळी कार्यकर्त्यांनी कृषिमंत्री कोकाटे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
भिकारी एक रुपयाही घेत नाही, पण आम्ही एक रुपयात शेतकर्यांना पीक विमा देतो असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री कोकाटे यांनी केले होते. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री कोकाटे कोल्हापुरात येणार असल्याने त्यांना गनिमी काव्याने घेराओ घालून जाब विचारण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अजित पोवार, विक्रम पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप चौगुले, संपत पवार, राहुल दिगंबरे, भिकाजी चव्हाण, पिंटू शेराने आदींचा समावेश होता.