गुन्हेगारीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढच होत चालल्याचे चित्र अनेक भागात पहावयास मिळत आहे. खून, मारामारी, अवैद्य धंदे यांमध्ये वाढ होऊ लागल्याचे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे. सांगोला येथील शोभनतारा झपके अध्यापक विद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य महेश होनराव यांचा १५ वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक गेल्या तीन दिवसांपासून सांगोला शहरात दाखल झाले आहे.
या पथकाकडून गुन्हा घडला त्या शाळेत सुरवातीपासून तपास केला जात असल्याचे समजते. त्यामुळे होनराव यांच्या खुनाचा उलगडा होतो की नाही हे येत्या काही दिवसांत समजणार आहे. सांगोला येथील शोभनतारा झपके अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य महेश होनराव हत्या प्रकरणाचा तपास गेल्या काही दिवसांपासून सीबीआयकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
सांगोला येथील कोर्टात गेल्या दीड वर्षापूर्वी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावत या प्रकरणातील मूळ फिर्यादी यांचे म्हणणे ग्राह्य धरून प्राचार्य महेश होनराव हत्या प्रकरणाचा पुढील तपास नव्याने सुरू करून ठोस कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून व आता गेल्या तीन दिवसांपासून सी पथक सांगोला येथे होनराव प्रकरणाचा तपास करीत असल्याचे समजते. त्यामुळे तब्बल १५ वर्षांनंतर तरी प्राचार्य महेश होनराव यांच्या मारेकऱ्यांचा तपास आता तरी लागणार का, याची चर्चा मात्र होताना दिसत आहे.