काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या असून या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. हल्ला झालेल्या बैसरन या पठारी भागात मोठ्या प्रमाणात लष्करी जवान तैनात करण्यात आले असून वेगवेगळ्या टीम बनवून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. जवळपास 2000 हजार जाणांना वेगवेगळ्या कारवायांमध्ये ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे. असं असतानाच आता भारतीय सुरक्षादलांनी या हल्ल्यातील एका दहशतवाद्याचं घरच उडवून दिलं आहे.
नेमकं घडलं काय?
दक्षिण काश्मीरमधील त्रालमधील मोनाघन भागात लष्करचा दहशतवादी आसिफ शेखचे घर लष्करी कारवाईदरम्यान उद्ध्वस्त करण्यात आले आहे. आसिफ शेख हा पहलगाममधील हल्ल्यात सहभागी असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांपैकी एक असल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशन सुरु केलं असून त्याच कारवाईदरम्यान आसिफ शेखचं घर उडवून देण्यात आल्याची चर्चा आहे.
पोलिसांचं म्हणणं काय?
एकीकडे हे घर उडवून देण्यात आल्याचं सांगितलं जात असतानाच स्थानिक पोलिसांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. स्पेशल फोर्सने म्हणजेच एसएफने केलेल्या झडतीदरम्यान आसिफ शेखच्या घरात काही संशयास्पद वस्तू आढळून आल्या. सुरक्षा दलांना धोका जाणवला. सुरक्षिततेसाठी स्पेशल फोर्सच्या तुकडीतील जवान या घरातून तातडीने मागे हटले. मात्र जवान या घराबाहेर पडले अन् त्याच वेळी तिथं मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये घराचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरात असलेल्या काही संशयास्पद स्फोटक पदार्थांनी पेट घेतल्याने स्फोट झाला.
पाकिस्तानी लष्कराकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार
कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानने अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी लष्कराकडून नियंत्रण रेषेवर काही ठिकाणी छोट्या शस्त्रांनी गोळीबार सुरू करण्यात आला. भारतीय लष्कराने त्याला प्रभावी प्रत्युत्तर दिले. कोणतीही जीवितहानी नाही. अधिक तपशीलाचा शोध घेतला जात असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे..
कोम्बिंग ऑपरेशन सुरु
चौथ्या दिवशी बैसरणमध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरूच आहे, लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ त्यांच्या कमांडो विंग आणि अत्याधुनिक पाळत ठेवण्याच्या उपकरणांसह कारवाई करत आहेत. तंगदार भागात कुलगाम आणि त्याच्या वरच्या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरूच आहे. काल रात्री सैन्याने दहशतवादी लपून बसलेल्या अड्ड्यांवर छापा घातला. या ठिकाणी काही स्वयंपाक साहित्य जप्त करण्यात आलं आहे. काश्मीरमध्ये सुमारे 2000 लोकांना ताब्यात घेतले असून त्यापैकी 250 फक्त पहलगाममध्ये आहेत आणि त्यांची चौकशी केली जात आहे.
बांदीपोरामध्ये 2 ते 3 दहशतवादी
उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा येथील कुलनार बाजीपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या परिसरात 2 ते 3 दहशतवादी असल्याची शक्यता आहे. काही दहशतवादी जखमी झाल्याचीही माहिती आहे. गेल्या दोन दिवसांत बांदीपोरा येथे सुमारे सात जणांना अटक करण्यात आली ज्यांनी दहशतवाद्यांना साथ दिली आहे.
