पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे भेसळीच्या दूधासाठी केला पाम ऑईलचा वापर; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे दूध भेसळ सुरूअसल्याची माहिती करकंब पोलिस ठाण्याचे सपोनि सागर कुंजीर यांना मिळाली होती. त्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे दत्तात्रय जाधव यांच्या घरी छापा टाकला. त्यावेळी दत्तात्रय महादेव जाधव यांच्या शेती गटनंबर ४५१ मध्ये दूध भेसळीसाठी वापरण्यात येत असलेल्या पाम ऑईलसह १७ लाख ६ हजार रुपये किमतीचा कच्चा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही करकंब पोलिस ठाणे व अन्न व औषध प्रशासन विभागाने दि २१ रोजी मध्यरात्री १२:३० वाजता करण्यात आली.

याप्रकरणी साठा मालक दत्तात्रय महादेव जाधव, अनिकेत बबन कोरके, सचिन अरुण फाळके यांच्यावर करकंब पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.  ही कारवाई सपोनि सागर कुंजीर, अन्न व औषध प्रशासन सह. उपायुक्त सुनील जिंतूरकर, उमेश भुसे, चन्नवीर स्वामी, मंगेश लवटे, श्रीशैल हिटनळी, बापू मोरे, बालाजी घोळवे, विजय गोरवे, पाटेकर, सुर्वे यांनी केली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्या ठिकाणी १३ लिटर दूध, ६१ हजार ५०० रुपये किमतीची ६९९ किलो स्कीम्ड मिल्क पावडर, ५ हजार ३०० रुपये किमतीचे ६२ किलो व्हे परमिट पावडर (६२ किलो), २३ हजार ५०० रुपये किमतीचे रिफायन्ड पामोलिन तेल (१२४ किलो), ४ हजार ६०० रुपये किमतीचे पांढरे केमिकल द्रव (२३ लिटर), ९८ हजार ६०० रुपये किमतीची होम मिल्क पावडर (५०६ किलो) असे यासह वाहन व इतर साहित्य मिळून एकूण १७ लाख ६ हजार रुपये किमतीचा दूध भेसळीसाठी लागणार कच्चा माल जप्त केला.