सांगोला तळ्यावरील बंधाऱ्यावर कपडे धुवायला गेलेल्या महिलेचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १२ मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निजामपूर (ता. सांगोला) येथे घडली. सुवर्णा भाऊसाहेब लवटे (वय-२७, रा. निजामपूर) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. सुवर्णा लवटे व तिची इयत्ता तिसरीला असलेली लहान मुलगी अश्विनी या दोघी मायलेकी घराच्या जवळ असलेल्या द्रयाबाच्या तळ्याबर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.
या तळ्यामध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडल्याने तळ्यामध्ये पाणी होते. आजूबाजूच्या महिला येथे कपडे धुण्यासाठी जातात. दरम्यान सुवर्णा लवटे या कपडे धुवत असताना अचानक पाय घसरून तळ्यात पडल्या. शेजारी तळ्याच्या काठावर उभी असलेली लहान मुलगी आई तळ्यात पडल्याने आरडा ओरड करीत पळत घरी गेली व आई तळ्यामध्ये पाय घसरून पडल्याचे सांगितले दरम्यान आजूबाजूचे लोक गोळा झाले व त्यांनी पाण्यात पडलेल्या सुवर्णा हिला बाहेर काढले.
त्वरीत तिला सांगोलाच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी सुवर्णा लवटे हिला तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी अश्विनी (वय ८) व मुलगा संस्कार (वय ९) असा परिवार आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगोला पोलिसात खबर दिली आहे.