सध्या अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. सध्या उन्हाचा ताव वाढत आहे. पण अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. हातकणंगले ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. हातकणंगलेची वाढती लोकसंख्या व होणारा विस्तार लक्षात घेता जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत आहे. सध्या शहरवासीयांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हातकणंगलेसाठी ६० कोटींची नवीन नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी केली होती.
या मागणीस शिंदे यांच्या बैठकीत तत्वतः मान्यता दिली होती. त्यानुसार नगरपंचायत प्रशासनाकडून तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला होता. नेज ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध होत नसल्यामुळे तांत्रिक मान्यता मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. यासाठी खासदार माने यांनी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करून ही नवीन पाणीपुरवठा योजनेस नेज ग्रामपंचायत हद्दीत जागा देण्याच्या ठरावाची प्रत खासदार माने यांच्या हस्ते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्याकडे देण्यात आली. यामुळे लवकरच तांत्रिक मान्यता मिळून प्रशासकीय मान्यता मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.