पंचगंगा नदीच्याप्रदूषणाला हातभार लावणाऱ्या ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव यांनी सात पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहिले आहे.नदीप्रदूषणाबाबत १२ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात सुनावणी झाली होती. यावेळी यानंतरच्या होणाऱ्या सुनावणीमध्ये पंचगंगा नदी खोऱ्यातील ग्रामपंचायतींनी नदी प्रदूषित होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या, याचा अहवाल सादर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
त्यानुसार आता जिल्हा परिषदेने हा अहवाल मागवला आहे. पंचगंगा नदी ही तुळशी, भोगावती, कुंभी, कासारी आणि धामणी या पाच नद्यांपासून बनली आहे. या नदीच्या प्रदूषण निर्मूलनासाठी गेली अनेक वर्षे प्रयत्न सुरू असून, केवळ बैठका, आराखडे यातच खूप कालावधी निघून गेला आहे.या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदेने केवळ कोल्हापूर शहर आणि पुढच्या गावांना जबाबदार न धरता पंचगंगेच्या खोऱ्यातील म्हणजे संगमाआधीच्या पाचही नद्या आणि पंचगंगेच्या काठावरील अशा एकूण १८१ गावांना जबाबदार धरले आहे. त्यामुळेच गगनबावडा, हातकणंगले, करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी आणि शिरोळ या सात तालुक्यांतील ज्या ग्रामपंचायतींनी गावातील सांडपाणी, कचरा नदीत जाऊ नये यासाठी उपाययोजना केलेल्या नाहीत, त्यांना या नोटीस काढण्यात येणार आहेत.