अलीकडे फॅशन चा ट्रेंड खूपच वाढलेला आहे. कोण काय कधी करेल याची कल्पनाही करता येत नाही. असाच एक वेगळाच अंदाज खानापूर तालुक्यातील आळसंद येथे पहावयास मिळाला आहे. सध्याच्या जमान्यात अनेकजण डीजे डॉल्बीच्या तालावर नवरा नवरीचे स्वागत करत असले तरी याला फाटा देत केवळ पारंपरिकता जपण्याचा संकल्प सांगलीच्या आळसंदमधील कुंभार कुटुंबाने केला आहे. आपल्या मुलाच्या लग्नात सुनेचे स्वागत करण्यासाठी चक्क सासऱ्याने आपली बैलगाडी नववधूच्या स्वागतासाठी आणली होती.
तिला बैलगाडीतून बसवून पारंपारिक वाद्य वाजवत लग्न मंडपापर्यंत आणल्याने या विवाह सोहळ्याची चर्चा परिसरात रंगली होती. आजकालच्या जमान्यात लग्न म्हटले की डीजे, साऊंड सिस्टिम, फटाक्यांची आतषबाजी, साऊंड सिस्टिमसमोर नाचगाण्याचा कार्यक्रम प्रामुख्याने असतो. मात्र, याला फाटा देत सांगलीच्या खानापूर तालुक्यातील आळसंद येथील कुंभार कुटुंबियांनी शेतकरी स्टाईलची परंपरा आपल्या मुलाच्या लग्नात केली.
आपल्या भावी सुनेची चक्क त्यांनी बैलगाडीतून वाजत गाजत लक्षवेधी एन्ट्री करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. खानापूर तालुक्यातील आळसंद येथे रोहित कुंभार व प्राजक्ता यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. रोहितचे वडील तसे शेतकरी कुटुंबातील आहेत. पूर्वीपासूनच या कुटुंबात बैलांची जोडी आहे. परंपरेप्रमाणे ते आपल्या रूढी परंपरा जपत आहेत.
आज देखील गेल्या तीन पिढ्यांपासून शेतकरी कुटुंबाची परंपरा जपणाऱ्या कुंभार कुटुंबाने अनोखा विवाह सोहळा पार पडला. मुलाचे वडील दगडू कुंभार यांनी आपल्या मुलाच्या लग्नात भावी सुनेची एन्ट्री चक्क शेतकरी पद्धतीने पारंपारिक वाद्यांच्या निनादात गावातून काढली. अतिशय उत्साही वातावरणात हा अनोखा विवाह सोहळा पार पडला.
गावात नववधू दाखल होताच वराडी मंडळींचे स्वागत गावातील मान्यवरांनी केले. पारंपारिक वाद्य वाजवत नववधूला बैलगाडीमध्ये बसवत त्यांनी गावातून लग्न मंडपापर्यंत तिला आणले. यावेळी तिची ही अनोखी एन्ट्री गावकऱ्यांची लक्ष वेधून घेत होती. मात्र भावी सुनेची चक्क बैलगाडीतून वाजत गाजत लक्षवेधी झालेली “एन्ट्री” परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.