शासनाकडून अनेक नवनवीन योजना प्रकल्प तसेच उपक्रम राबविले जात आहेत. सध्या अनेक स्पर्धा देखील घेतल्या जातात. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात यशवंत पंचायत राज अभियान राबविले जाते. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व कामकाजाचे मूल्यमापन केले जाते. यशवंतराव चव्हाण पंचायत समिती अभियान २०२४-२५ या वर्षात राज्यातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा व पंचायत समिती पुरस्काराबाबत विभाग स्तरावरील पारितोषिक निवड समितीची पुणे येथे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. त्यात विभागीय स्तरावरील गुणाकंनानुसार यशवंत पंचायत राज अभियानामध्ये खानापूर पंचायत समितीला पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाल्याचे विभागीय उपायुक्त विजय मुळीक यांनी घोषित केले. याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी दिली.
सन २०२३ – २४ मध्ये खानापूर पंचायत समितीने या अभियानात सहभाग घेतला होता. गेल्या आठवड्यात पुणे विभागीय स्तरावरील कमिटी पंचायत समितीच्या तपासणीसाठी आली होती. विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगल्याप्रकारे दस्तऐवज कमिटीला दाखविले. फिल्डवरच्या कामांची कमिटीने पाहणी केली आणि आज निकाल घोषित होऊन पंचायत समितीला पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे. पुढे ते म्हणाले, पंचायत समितीच्या सर्व अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाने वर्षभरात लोकोपयोगी जी कामे झाली. त्याचा हा गौरव झाला असे वाटते.
आमदार सुहास बाबर यांचे यासाठी चांगले मार्गदर्शन मिळाले. या स्पर्धेत विभागीयस्तरावर प्रथम क्रमांक आल्यामुळे ११ लाख रूपयांचे रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र १२ मार्चला मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंचायत समितीला मिळणार आहे. दरम्यान बहुजन अधिकारी, कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष एस. आर. भोसले यांच्या हस्ते गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. यावेळी दिलीप भोसले, देवकुमार दुपटे, रविकिरण जावीर उपस्थित होते.
याबाबत आमदार सुहास बाबर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, माजी सभापती महावीर शिंदे, एस.आर. भोसले, देवकुमार दुपटे, दिलीप भोसले यांच्यासह अनेकांनी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.