सांगोला तालुक्यात पाचशे लाडक्या बहिणी झाल्या कमी! ८४ हजार लाभार्थी; सर्वेक्षणानुसार आणखी नावे कमी होण्याची शक्यता

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या खूपच गाजावाजा करीत असल्याचे चित्र सर्वानाच दिसत आहे. पण सध्या अपात्र महिलांच्या सर्वेक्षणाचे काम चालू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत सांगोला तालुक्यातील ५०० लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर चारचाकी वाहने असल्याचे आढळले आहे.

या कारणास्तव, या महिलांना योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अजूनही सर्व्हेचे काम सुरू असल्यामुळे चारचाकी वाहनधारक लाडक्या बहिणी वाढणार आहेत.  सांगोला तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ८४ हजार महिलांना लाभ मिळाला आहे. आता या योजनेतील लाभार्थीसाठी शासनाने नवीन अटी घातल्यामुळे अनेक लाभार्थी महिलांची नावे वगळली जाणार आहेत. राज्य शासनाने या योजनेतील अपात्र लाभार्थाची ओळख पटवण्यासाठी परिवहन विभागाच्या मदतीने चारचाकी वाहनधारकांची यादी तयार केली आहे.

या यादीनुसार, तपासणीत चारचाकी वाहन असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित महिलांचे नाव योजनेतून वगळले जाईल, असे सांगण्यात आले आहे. राज्य शासनाने अपात्र लाभार्थीना स्वतःहून लाभ सोडण्याचे आवाहन केले होते; परंतु कमी प्रतिसाद मिळाल्याने आता चारचाकी वाहने असणाऱ्या लाडक्या बहिणीचा शोध सुरू झाला आहे. ज्यांच्या नावे चारचाकी वाहने आढळून येत आहेत, अशा लाभार्थीची नाये योजनेतून वगळण्याची कारवाई सुरू आहे. 

सांगोला तालुक्यात आतापर्यंतच्या सर्व्हेनुसार ४९८ महिलांची नावे सापडली असून, त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. अजूनही तपासणीचे कामकाज सुरू असून यापेक्षा जास्त महिला या योजनेतून वगळल्या जाणार आहेत. सुरवातीत्य या योजनेचा लाभ मिळाला; परंतु काही कारणास्तव आता या योजनेतून नावे वगळल्या जात असल्यामुळे लाडक्या बहिणीकडून सरकारच्या या धोरणाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.