दोन महिन्यात गावभाग पोलीस ठाण्याच्या चार अधिकाऱ्यांची बदली, चर्चेचा विषय….

इचलकरंजी शहरात अनेक राजकीय समीकरणे आपल्याला बदलल्याचे चित्र लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत पहायला मिळाले. दोन महिन्यांपूर्वी गावभाग ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रविण खानापूरे यांची अचानकपणे बदली करण्यात आली. त्यांच्या जागी प्रमोद शिंदे यांची नियुक्ती झाली होती. त्यांचा कालावधी १ महिना १३ दिवसांचा झाला असतानाच त्यांचीही तडकाफडकी कोल्हापूर मुख्यालयाकडे बदली करण्यात आली.

त्यानंतर ७ दिवस हा पदभार शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडील शरद वायदंडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर या पदावर दत्तात्रय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचाही अवघा महिना पूर्ण होण्यापूर्वीच तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक चव्हाण यांची नियुक्ती झाली असून त्या संदर्भातील आदेश जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी जारी केले आहे.

इचलकरंजी  येथील गावभाग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय देशमुख यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पोलिस निरिक्षक महेश चव्हाण यांनी तातडीने रात्री पदभार घेतला. अवघ्या दोन महिन्यात चौथ्यांदा गावभाग पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची बदली नियुक्ती झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.  अवघ्या दोन महिन्यात गावभाग पोलिस ठाण्याच्या निरिक्षकपदावर चार अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि तडकाफडकी बदली झाल्याने त्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. या मागचे नेमके कारण काय? याची उत्सुकता ताणली जावू लागली आहे.