सध्या अनेक वाहनचालक हे मद्य पिऊन ड्रायव्हिंग करीत असल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. मद्य प्राशन करून ड्रायविंग करणे हा गुन्हा आहे. पण या नियमाचे अनेक जण उल्लंघन करीत असतात. एसटी बसच्या चालकाने मद्य प्राशन करून बस चालवून प्रवाशांच्या जिवाशी खेळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी सांगोल्याहून जतकडे निघालेल्या बसमध्ये घडली.याप्रकरणी सहायक वाहतूक अधीक्षक पंकज श्रीराम तोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक सुभाष अप्पासाहेब साळुंखे (रा. लोहगाव, ता. जत, जि. सांगली) याच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगोला ते जत ही एसटी बस रविवारी दुपारी दीडच्या सुमारास एमएच ०६ एस ८०८४ जवळा मार्गे जाणारी सांगोला बसस्थानकातून मार्गस्थ झाली. दुपारी साडेबारा वाजता सुटणारी सांगोला ते जत बस तब्बल एक तास उशिराने सोडण्यात आली. बसचालकाने मद्यप्राशन करून सांगोला ते जत जाणारी बस भरधाव चालवण्याचा प्रकार जवळा गावात उघडकीस आल्याने प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दारूच्या नशेत तर्र असलेल्या बसचालकाने जवळा गावात एका दुचाकीला धडक दिली. यावेळी बसचालक दारूच्या नशेत असल्याचे दिसून येताच प्रवाशांनी जवळा गावातच बस थांबवली. यामुळे बसमधील ४६ प्रवाशांचे प्राण वाचले. त्यानंतर सांगोला आगारातून दुसऱ्या बस चालकास बोलावून सांगोला ते जत ही बस मार्गस्थ करण्यात आली.