उन्हाळा आला की गारवा देणारे फळ रस्त्या रस्त्यांवर दिसू लागते. लालसर आणि रसदार असलेले हे फळ बच्चे कंपनीपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या आवडीचे आहे. काही भागात त्याला टरबूज म्हटले जाते. परंतु त्याची ओळख कलिंगड म्हणून आहे. त्याच्या रंगावर न जाता नैसर्गिक पिकलेले कलिंगड कसे ओळखावे? कलिंगड अधिक चांगले दिसण्यासाठी फळ विक्रेते कृत्रिम रंग व रसायनांचा वापर करतात. काही वेळा इंजेक्शनद्वारे कलिंगडांना कृत्रिम रंग दिला जातो. त्यामुळे रसदार लालभडक कलिंगड घेण्यापूर्वी त्याची योग्य तपासणी करणे गरजेचे आहे.
कलिंगडचा एक भाग नेहमी जमिनीला टेकलेला असतो. हा भाग नैसर्गिकरित्या किंचित पिवळसर असतो. परंतु बाजारात जेव्हा तुम्हाला संपूर्ण कलिंगड एकसारख्या रंगाचे दिसेल तेव्हा ते कृत्रिमरित्या पिकवलेले असण्याची शक्यता आहे. कलिंगडचा रंग नैसर्गिक आहे की नाही, ते तपासण्यासाठी त्याचा एक तुकडा पाण्यात टाका. जर पाणी गुलाबी झाले तर कलिंगडाला कृत्रिम रंग दिलेला असण्याचे स्पष्ट होईल. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या कलिंगडाच्या बिया तपकिरी किंवा काळ्या रंगाच्या असतात. परंतु कृत्रिमरित्या त्यांच्यात रंग भरला असल्यावर त्याच्या बिया या पांढऱ्या रंगाच्या असतात. तसेच त्या बियासुद्धा आतून गडद लालसर दिसतात.
लालसर, रसाळ कलिंगड दिसण्यास मोहक दिसत असले तरी त्यात रसायनांचा वापर केल्यावर आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी नैसर्गिक फळांची निवड करा.