आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंगळवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या रवळनाथ विकास आघाडीने १९ जागांवर दिमाखदार विजय मिळवत सत्ता मिळवली. त्यांनी माजी मंत्री सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे व ठाकरे गट यांच्या चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीचा दारुण पराभव केला.
या आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे.या कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विनय कोरे आदींनी प्रयत्न केले होते.
अखेर रवळनाथ आघाडी आणि चाळोबा देव आघाडी यांच्यात चुरशीची निवडणूक झाली. रविवारी मतदान झाले. आज मतमोजणी होऊन रवळनाथ आघाडीने सुमारे हजार मतांच्या फरकाने १९ जागांसह सत्ता मिळवली. निकालानंतर उमेदवार, कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सुनील शिंत्रे, अण्णाभाऊ संस्थाप्रमुख अशोक चराटी, गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजना रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, अभिषेक शिंपी यांच्यासह विद्यमान नऊ संचालक पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पण, निकालाने आता त्यांनाच या आर्थिक गर्तेतील कारखान्याची सत्तासूत्रे चालवावी लागणार आहेत.