प्रवाशांची चिंता वाढवणारी बातमी! सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वेचा ‘हा’ पूल पाडण्यात येणार

पुणे ते लोंढा रेल्वेमार्गाच्या (Pune to Londha Railway) दुहेरीकरणामुळे सांगली-मिरज रस्त्यावरील (Sangli-Miraj Road) मारुती मंदिरजवळील रेल्वे पूल पाडला जाणार आहे.त्याची प्राथमिक टप्प्यात तयारी सुरू करण्यात आली आहे. अत्यंत वर्दळीचा हा मार्ग असल्याने पर्यायी मार्ग कोणते असतील, याबाबत महापालिका आणि वाहतूक विभागाकडून माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्यांसाठीही चिंता वाढवणारी बातमी आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. तूर्त अवजड वाहतूकदेखील बंद केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

मिरज ते लोंढा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. त्यात रेल्वे पुलांचे रुंदीकरण हा महत्त्वाचा भाग आहे. सध्या सांगली ते माधवनगर मार्गावरील पुलाचे (Railway Bridge) काम सुरू आहे. तो पूल पाडण्यात आला आहे. त्याच्या बांधकामात काही बदल करण्याच्या कारणास्तव काम लांबणीवर पडले होते. ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

आता मिरज ते सांगली रस्त्यावरील पुलाचा निर्णय घेतला जाणार आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट याआधीच झाले आहे. हा पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल आहे. आता तर पुणे ते लोंढा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण होणार आहे. त्यामुळे रुंदी वाढवणे अत्यावश्‍यक आहे. त्यासाठी पूल पाडावा लागणार आहे.

तो कधी पाडायचा आणि त्यासाठी पर्यायी व्यवस्था काय करावी, याबाबत एक प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यात महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलिस उपस्थित होते. पर्यायी वाहतूक कोणत्या मार्गाने वळवावी, याबाबत महापालिका आणि वाहतूक विभागाने सुचवावे, असे बैठकीत ठरले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी याबाबत सगळ्या बाजू समजून घेतल्या. त्यांनी सांगितले की, या पुलाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्‍वासात घेतल्यानंतरच त्यावर निर्णय होईल. तूर्त कोणताही निर्णय झालेला नाही.