सोलापुरातील वेगवेगळ्या भागात मिळून सुमारे शंभरहून अधिक घार, बगळे आणि कावळ्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला. त्यांच्या मृत शरीराचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान या शासकीय प्रयोगशाळेत पाठविले होते. त्या अहवालानुसार मेलेल्या सर्वच पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले. हा रोग संसर्गजन्य असल्याने सोलापुरातील सर्व प्रकारचे पक्षीविश्व धोक्यात आले आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शहरातील धर्मवीर संभाजी तलाव जिल्हा परिषद, किल्ला बाग परिसर हे भाग पक्षांच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत. बर्ड फ्लू हा रोग पक्ष्यांपासून मानवाला होऊ शकतो, याची शक्यता गृहीत धरून नागरिकांनाही प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बाधित क्षेत्राच्या परिसरात नागरिकांच्या हालचाली, पक्षी, प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध केला आहे.
- नागरिकांनो, अशी घ्या काळजी
- घराच्या बाल्कनीत पक्ष्यांनी घाण केली असेल किंवा त्यांची विष्ठा असेल तर ती हँडग्लोव्हज् चा वापर करून ती जागा लगेचच साफ करावी.
- जागा साफ केल्यानंतर लगेच आपले शरीर साबणाने स्वच्छ करावे, तसेच संबंधित जागेवरही पुन्हा पक्षी येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- हा रोग पक्ष्यापासून मानवासाठी संसर्गजन्य असल्याने प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले.