पुण्यातील दगडूशेठ गणेश मंडळाचा देखावा ठरला !

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने 133 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे 108 दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवासस्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येणार असून भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली आहे.

सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा कलादिग्दर्शक विनायक रासकर आणि सरिता रासकर यांच्या हस्ते पार पडला. गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील राहिले आहे. यंदा ज्या पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे, ते मंदिर केरळ शैली आणि द्रविड शैलीच्या वास्तुकलेचे गुंतागुंतीचे मिश्रण करून बांधले गेले आहे. पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत 5 थरांचा गोपुर असणार आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात येणार आहेत. तर, गाभाऱ्यात विष्णू लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती असणार आहे. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात येणार आहे. नानाविध वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे 100 फूट इतकी असणार आहे.

पद्मनाभ स्वामींचे दर्शन तीन दरवाज्यांमधून घेता येणार आहे. पहिल्या दरवाज्यातून पद्मनाभ आणि त्याच्या हाताखाली शिवलिंगाचे रूप दिसेल. तर दुसऱ्या दरवाज्यातून पद्मनाभ, श्री देवी आणि भूदेवी यांच्या सोन्याच्या अभिषेक मूर्ती व पद्मनाभ स्वामींची चांदीची उत्सव मूर्ती पाहायला मिळेल. तर तिसऱ्या दरवाज्यातून देवतेचे चरण आणि भूदेवी व मार्कंडेय मुनी यांचे दर्शन होईल. अशा केरळमधील विलोभनीय पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती सन 2025 च्या गणेशोत्सवात देश-विदेशातील गणेशभक्तांना पुण्यात पाहायला मिळणार आहे.