जलयुक्त शिवारासाठी लोकसहभाग महत्वाचा; अमल महाडिक हेरले येथे बैठक संपन्न

सिद्धोबा डोंगर परिसरातील अनेक गावांतील शेती पाण्यापासून वंचित असून, जलयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी शासनाबरोबरच लोक सहभागही महत्त्वाचा असून, शासनाचा निधी वाढवण्याबरोबरच अटी शिथिल करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.

हेरले (ता. हातकणंगले) येथे आयोजित जलयुक्त शिवार बैठकीत बोलत होते. हेरलेसह, मौजे वडगाव, तासगाव, हालोंडी, माले मुडशिंगी, चोकाक, अतिग्रे, मजले, आळते, लक्ष्मीवाडी, ह्री बिरदेववाडी, कापूरवाडी, मिणचे या सिद्धेश्वर डोंगरा लगतच्या गावातील, तसेच कासारवाडी येथील हजारो म एकर शेतजमीन जिरायत आहे.

याठिकाणी शेत बागायत करण्यासाठी पंचगंगा नदी, अथवा वारणा नदीतून कोसो मैल दूरवरून पाइपलाइनने पाणी आणावे लागते. ते छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना अशक्य आहे. परिणामी येथील शेतजमिनीत चांगला कस असूनदेखील पाण्याअभावी शेती करण्यात शेतकऱ्यांना अनंत अडचणी येत आहेत. याची दखल घेऊन माजी आमदार महाडिक यांनी परिसरातील गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांची हेरले येथे बैठक बोलावली होती.

या बैठकीस उपस्थित हेरलेचे सरपंच राहुल शेटे, माले सरपंच राहुल कुंभार, वडगाव सरपंच कस्तुरी पाटील, चोकाक सरपंच सुनील चोकाककर, कासारवाडी सरपंच अच्युत खोत, उपसरपंच विलास खोत, शीतल हावळे, सचिन पाटील, अमित पाटील, विजय भोसले यांनी मनोगत व्यक्त करुन शेतीच्या पाण्यासाठी उपाययोजनांची गरज असल्याचे सांगितले.

जलसंधारण उपविभागीय अभियंता योगेश पोळ यांनी शासनाच्या योजनांबाबत माहिती दिली. यावेळी उपसरपंच बक्तीयार जमादार, कपिल भोसले, श्रीकांत पाटील, सुधीर परमाज, विशाल परमाज, संतोष रुईकर, मुडशिंगी सरपंच गजानन जाधव, उपसरपंच सुनील खारेपाटणे, स्वप्नील चौगुले आदी उपस्थित होते.