बागल चौकातील इंडिया पार्क इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ग्लॅमरस फॅमिली स्पामध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी बुधवारी (दि. २०) दुपारी छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी कुंटणखान्यातून पाच पीडित महिलांची सुटका केली.तसेच स्पा चालक नागेश रमेश बेळेण्णावर (वय ३१, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) आणि फ्लॅट मालक याशीर अब्दुल रशिद बागवान (रा. कदमवाडी, कोल्हापूर) या दोघांवर गुन्हा दाखल केला.
अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.याबाबत अधिक माहिती अशी की, बागल चौक परिसरातील इंडिया पार्क इमारतीमध्ये स्पाच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळाली होती.
त्यानुसार पंडित यांनी कारवाई करण्याच्या सूचना अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाला दिल्या. सहायक फौजदार मीनाक्षी पाटील यांच्या पथकाने बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ग्लॅमरस स्पा येथे छापा टाकला. यावेळी स्पामध्ये कुंटणखाना सुरू असल्याचे निदर्शनास आले.
पाच हजार रुपयांची रोकड, चार मोबाइल आणि निरोधची पाकिटे असा सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पाच पीडित महिलांची सुटका करून स्पा चालक आणि जागा मालकास ताब्यात घेतले. याबाबत मीनाक्षी पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास शाहूपुरी पोलिसांकडून सुरू आहे.