नागपूरमध्ये सोमवारी रात्री हिंसाचार उफळला होता. दोन गटांतील धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे मोठी जाळपोळ आणि दगडफेकीची घटना नागपुरात घडली. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सभागृहात निवदेन केले. यावेळी, सत्ताधाऱ्यांना या घटनेवरुन धारेवर धरणाऱ्या शिवसेना उबाठा पक्षाच्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी आक्रमक शैलीत सुनावले. तर, महाविकास आघाडीच्या काळातील घटनांचा उल्लेख करत उध्दव ठाकरेवरही हल्लाबोल केला. खुर्चीसाठी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले.
तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन खुर्ची मिळवली, विचारधारा सोडली. ह्यांचे पक्ष प्रमुख हे दिल्लीत गेले होते, लोटांगण घालून आले. मला वाचवा, मला वाचवा म्हणाले तिथे जाऊन सांगून आले की, आम्ही महायुती सरकारमध्ये सामील होऊ. मात्र, त्यांचा डाव मी पलटवून टाकला. पक्ष प्रमुखाला नोटीस आल्यावर तातडीने गेले होते लोटांगण घालायला, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी सभागृहात गौप्यस्फोटांची मालिकाच विशद केली.
महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा डाव होता. औरंग्याचे विचार यांनी घेतले, मात्र मी बाळासाहेबांना सोडले नाही. त्यामुळे, माझ्यासोबत ६० लोक आले, हिंदुत्वाचे सरकार मी आणले. तुम्हाला फक्त २० लोक निवडून आणता आले, असे म्हणत जनतेचा कौलही आमच्याच बाजूने असल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटले. ये शेर का बच्चा है, ८० जागा लढवल्या आणि ६० जागा जिंकल्या. आम्ही लढून जिंकू किंवा लढून शहीद होऊ. अनिल परब तुमच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत.
कोण नोटीसला घाबरून कुठे गेले हे मला माहिती आहे. मी कमरेखाली वार करत नाही, तुम्हाला नोटीस आल्यानंतर कुठे गेला होता हे मला माहिती आहे असाही गौप्यस्फोट शिंदेंनी केला. मला जोपर्यंत कोणी डिवचत नाही तोपर्यंत मी कुणाची कळ काढत नाही. सचिन अहिर तुम्हाला बरेच काही माहिती आहे. मी खुर्चीसाठी काहीच केले नाही मी स्वतः अमित शहा आणि नरेंद्र मोदींना फोन करून सांगितले, तुम्ही सांगाल तो निर्णय मला मान्य असेल. नागपूरची घटना दुर्दैवी आहे. अमेरिकेने ओसामा बिन लादेनचे थडगे होऊ नये म्हणून त्याला समुद्रात टाकले. त्यामुळे औरंग्याबाबत तुम्हाला काय प्रेम आहे. काँग्रेस काळात हे थडगे चालू आहे, असे म्हणत संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर कशाला हवी आहे, असा सवालच एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.