सांगोला तालुक्यात मका पीक जोमात

सांगोला तालुक्यात यंदा मका, सूर्यफूल, तूर आणि बाजरी या खरीप पिकांची पेरणी पूर्णत्वास आली असून, विशेषतः मक्याच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. सुरुवातीस पावसाचे आगमन समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी वेळेत पेरण्या करून घेतल्या.

शेतशिवारात पिके जोम धरून असताना, तब्बल दोन महिन्यानंतर जोरदार पाऊस झाला नसल्याने बहुतांशी शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. ऐन भरात पिकांना पाण्याची अत्यंत गरज भासत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस पावसाने ज्या पद्धतीने हजेरी लावली होती, त्यामुळे शेतकरी  वर्गात उत्साह दिसून येत होता, परंतु आषाढ महिना कोरडा गेला असल्याने शेतात पिक ऐन भरात असताना, पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. 

पशुपालक शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी व धान्य म्हणून मका पीक घेतात. मका पिकाची अपेक्षित वाढ झाल्यास,त्याचा कडबा जनावरांसाठी ठरतो.पावसाने 
हुलकावणी दिल्याने मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. जर येत्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर पीक करपत जाईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी चिंता शेतकरी वर्गातून सातत्याने व्यक्त केली जात आहे.