सांगोला तालुका भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर; पाणीपुरवठा योजना तीन महिन्यांपासून बंद

सांगोला तालुक्यात गेल्य महिन्यापासून उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढली आहे. उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सांगोला तालुक्यातील अनेक बंधारे, तलाव व जलसाठे कोरडेठाक पहले आहेत. जलयुक्त शिवारांतर्गत बांधलेल्या बंधाऱ्यात पाण्याचा टिपूसही नसल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. सांगोला तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट असून अनेक गावात विहिरी, विंधन विहिरी आटत चालल्याने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना व जलजीवन मिशन योजनेवर सुमारे ६०० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पण, या योजनाही केवळ कागदावरच आहेत. शिरभावी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेकडे ५ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. यामुळे वीज वितरण कंपनीकडून योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. यामुळे मागील तीन महिन्यांपासून योजना बंद आहे.

२५ मार्च रोजी शिरभावी योजनेच्या अधिकाऱ्यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत थकित वीज बिलावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सांगोला तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीकडे सुमारे १ कोटी ४३ लाख २८ हजार रुपयांची रुपये थकबाकी आहे. पाणी टंचाईची झळ आतापासून बसू लागली आहे. सांगोला तालुक्यातील माण व कोरडा नदीवरील १९ बंधाऱ्यासह अचकदानी तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे. दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता म्हैसाळ व टेंभूच्या आवर्तनाकडे लागल्या आहेत. सद्यस्थितीला विहिरींची पातळीही घटल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे.

शिरभावी योजनेच्या नूतनीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मार्च अखेर योजना कार्यान्वित करण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. तर तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची कामे संथगतीने सुरु असल्याने अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना बंद आहेत. त्यांमुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आतापासूनच गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांना पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे जनावरे व पिके जगविण्यासाठी बळिराजाची चिंता वाढली आहे.