बदलत्या वातावरणामुळे डाळिंबावरील मर व तेलकट रोगामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी पुरते हवालदील झाले आहेत.डाळिंबावर पडलेल्या मर व तेलकट रोगामुळे उध्वस्त झालेल्या डाळिंबाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.
सांगोला तालुका हा परंपरागत दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षात सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाळिंबाचे भरघोस आणि दर्जेदार पीक घेऊन देशासह परदेशामध्ये तसेच जगाच्या नकाशामध्ये सांगोला तालुका हा दर्जेदार डाळिंब उत्पादन करणारा तालुका अशी ओळख निर्माण केली होती.मात्र गेल्या चार वर्षापासून डाळिंबाला बदलत्या वातावरणामुळे ग्रहण लागले आहे.
गेल्या दोन वर्षात तर मर रोग पिन होल बोरर रोग यामुळे अनेक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या बागा त्यांच्या डोळ्यादेखत उध्वस्त झाल्या आहेत. तालुक्यातील बहुतांश डाळिंबाच्या बागा शेतकऱ्यांनी मर रोगामुळे व पिन होल बोरर रोगामुळे काढून टाकल्या. गेल्या दोन वर्षात डाळिंब उत्पादक डाळिंबावर पडलेल्या रोगामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.
या डोळ्यादेखत जळालेल्या व काढून टाकलेल्या डाळिंबाच्या बागांना शासनाकडून कोणत्याही प्रकारे पंचनामे झाले नाहीत किंवा कोणतीही शासकीय मदत मिळाली नसल्याचे बोलले जात आहे.यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उर्वरित राहिलेल्या बागांना अनेक प्रकारची महागडी औषधे फवारून व विविध उपाय योजना करून हातावरच्या फोडासारखे जपले आहेत.
पण चालू वर्षीही अवेळी पडणारा पाऊस, हवेतील गारवा, हवेतील उष्णता, तसेच कडक ऊन , धुके असे वारंवार बदलणारे वातावरण यामुळे तालुक्यात शिल्लक असणारे डाळिंब सध्या तेलकट रोगामुळे व मर रोगामुळे उध्वस्त होऊ लागले आहेत. हे डाळिंब जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी महागडी औषधे, खते व मजूर लावून मोठ्या प्रमाणात खर्च करताना दिसत आहेत. या खर्चासाठी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी विविध बँकातून कर्ज घेतले आहेत. सध्या बदलत्या वातावरणामुळे तालुक्यातील सर्वच डाळिंब बागांवर मर रोगाचे व तेलकट रोगाचे आसमानी संकट आले आहे.
वातावरणाच्या या लहरीपणामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मात्र धास्तावले असल्याचे दिसून येत आहे. बँकांचे कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न सध्या डाळिंब बागायतदार शेतकरी बांधवांना पडत आहे. बदलत्या वातावरणाच्या लहरीपणामुळे व नैसर्गिक अस्मानी संकटामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे.