सांगोल्यातील फॅबटेक मल्टिस्टेटने जपली माणुसकी; मयत कर्जदार महिलांचे ५७ लाखांचे कर्ज माफ 

सध्या मार्च अखेरमुळे विविध बँका, मल्टिस्टेट, पतसंस्था यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी मोठा धुमधडाका सुरू आहे. फॅबटेक मल्टिस्टेटने ९० मयत कर्जदार महिलांचे ५७ लाख १९ हजार रुपयांचे कर्ज माफ करून फॅबटेक मल्टिस्टेटने माणुसकी जपली आहे. सदर कर्जदार मयत महिलांच्या नातेवाईकांना महिला दिनाचे औचित्य साधून कर्जमाफीचा दाखला देखील देण्यात आला आहे. ना जीआर, ना घोषणा, थेट अंमलबजावणी हे फक्त फॅबटेक मल्टीस्टेटचं करू शकते. या निमित्ताने फॅबटेक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक आणि स्वागत होत आहे. 

यावेळी फॅबटेक मल्टीस्टेट को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि. सांगोला या संस्थेचे संस्थापक चेअरमन भाऊसाहेब रुपनर यांनी शुद्ध हेतु व दूरदृष्टी ठेवून संस्था स्थापन केली. अडचणीच्या वेळी अथवा कर्जदार मयत झाल्यास त्याची झळ कुटुंबाला बसू नये, कुटुंब उद्धस्त होवू नये म्हणून त्यांच्या दूरदृष्टीने स्वनिधितून अशा सभासदांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, संस्थापक चेअरमन भाऊसाहेब रुपनर म्हणाले की, फॅबटेक मल्टीस्टेट ही संस्था ५०० कोटींच्या व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल करत असून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात एकूण ३० शाखा कार्यरत आहे.

जिथे सर्वसामान्य व वंचित घटकांचा, त्यांच्या आर्थिक सक्षमतेचा विचार पहिला केला जातो. त्यासाठी योग्य त्या कर्जसुविधा आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण उपलब्ध करत असतो, आणि याचा बऱ्याच महिलांना व लघु उद्योजकांना आजवर फायदा झालेला आहे. यापुढेही होत राहणार आहे. सर्वसामान्यांच्या प्रगतीत आमच्या फॅबटेक मल्टीस्टेटची प्रगती दडलेली आहे.