शाळेची सहल परतताना अनर्थ, बसचा अपघात, विद्यार्थ्यांच्या डोळ्यांदेखत …

शैक्षणिक सहलीवरून घरी परतत असणाऱ्या बसचा अपघात होऊन एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक शिक्षक व विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची सहल कोकण दर्शन करून परतीचा प्रवास करत होती. त्याच दरम्यान आज पहाटे सहाच्या सुमारास रस्त्यावर उभा असलेल्या टेम्पोला बसची धडक लागून हा अपघात झाला.

सदरचा अपघात माळशिरस तालुक्यातील वटपळी या ठिकाणी झाला. शिक्षक बाळकृष्ण काळे वय (५०) यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर शिक्षक रमाकांत शिरसाठ व एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे.मिळालेली माहिती अशी की, सदरचा अपघात आज पहाटे सहाच्या सुमारास घडला. इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल कोकण दर्शन करून परतीचा प्रवास करत होती. या प्रवासादरम्यान चालका शेजारील आसनावर शिक्षक बाळकृष्ण काळे बसले होते. सकाळी सहाच्या सुमारास बस माळशिरस तालुक्यात आली होती. दरम्यान माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे एक टेम्पो उभा होता. या थांबलेल्या टेम्पोला शाळेची शैक्षणिक सहलीची बस (एम‌.एच१४ बी.टी ४७०१) धडकली. अचानक झालेल्या या अपघातात पुढे बसलेले शिक्षक काळे जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पावले. या अपघातात दुसरा एक शिक्षक व विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. इतर विद्यार्थ्यांना सुखरूप आपापल्या घरी पोचविण्यात आले आहे. जखमी झालेल्या शिक्षकाला विद्यार्थ्याला अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.