पंढरपूर येथे रेल्वे विभागाच्या जागेवर २५ कोटी रुपये खर्चून साकारणार संत नामदेव यांचे स्मारक

तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे २५ कोटी रुपयांतून संत नामदेव महाराजांचे स्मारक साकारण्यात येणार आहे. रेल्वे विभागाकडून महाराष्ट्र शासनाला मिळालेल्या त्या १६ एकर जागेच्या परिसरात हे स्मारक होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज स्मारकाच्या आढावा बैठकीचे सोमवारी आयोजन केले होते. या बैठकीस अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव एक संघचे संस्थापक अध्यक्ष महेश ढवळे, श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूरचे अध्यक्ष गणेश उंडाळे, नामदेव समाज उन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर, सोलापूर शिंपी समाजाचे अध्यक्ष महेश रेळेकर, प्रथमेश परांडकर, युवराज चुंबळकर, राजेश केकडे, गुरुनाथ पतंगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

या स्मारकासाठी संत नामदेव महाराज संबंधित संस्थांकडून सूचना मागविल्या आहेत. सूचना आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आर्किटेक्चर नेमून स्मारकाचे डिझाईन केले जाणार आहे. हे स्मारक पंढरपूरच्या ६५ एकर जागेच्यालगत असलेल्या रेल्वे विभागाच्या १६ एकर जागेवर साकारणार असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले.