सांगोल्याजवळच्या भीषण अपघातात दांपत्याचा जागीच मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

सांगोला शिरभावी रस्त्यावर चिंचोली जवळ झालेल्या भीषण अपघातात क्षीरसागर दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा चौदा वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना मंगळवारी सकाळी ७. ३० च्या दरम्यान घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरभावी ता. सांगोला येथीत बँक ऑफ महाराष्ट्र येथे नोकरीस असलेले धनंजय क्षीरसागर हे त्यांची पत्नी सुवर्णा व मुलगा ब्रह्म यांचे समवेत दुचाकीवरून शिरभावी कडे निघाले असता भरधाव वेगाने आलेल्या पिकप वाहनाने जोराची धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर मोटरसायकलवरील तिघेही उडून आजूबाजूला फेकले गेल्याचे प्रत्यक्षदर्शी कडून समजले.

अपघातात क्षीरसागर दामपत्याचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या मुलाला सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार करून नंतर पुढील उपचारासाठी सांगलीला पाठवण्यात आले आहे. मयत धनंजय क्षीरसागर हे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये शिरभावी शाखेत अनेक वर्षांपासून नोकरीस होते तर त्यांच्या पत्नी सुवर्णा या शिरभावी येथे टेलरिंगचा व्यवसाय करत होत्या. या दाम्पत्यास तीन मुली व एक मुलगा असून त्यापैकी दोघी बाहेर शिक्षण घेत आहेत. क्षीरसागर दांपत्याचा मृत्यूमुळे शिरभावी गावावर शोककळा पसरली आहे. 

सांगोला चिंचोली रस्त्यावर डाळिंब बाजार भरत असल्यामुळे पिकप वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ही वाहने भरधाव वेगाने चालवणे, कर्कश आवाजात सतत हॉर्न वाजवणे, रस्त्यावर वाहने उभा करणे, रस्त्यावर वाहने उभा करणाऱ्या चालकाला कोणी विचारलं तर दादागिरीची भाषा वापरणे आदी प्रकार सर्रास घडत असून या चिंचोली रस्त्यावरचा डाळिंब बाजार कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी चिंचोली रोड व परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून होत आहे.