विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटाला उतरती कळा लागली आहे. उद्धव ठाकरे गट सध्या राजकारणात वेगवेगळ्या अडचणींचा सामना करत आहे. पाच वर्षानंतर दिशा सालियान मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर वेगवेगळे आरोप सुरु आहेत. दुसऱ्याबाजूला पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत आहेत. उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु आहे. सध्याच्या स्थितीत ठाकरे गटातून बाहेर पडणाऱ्यांच प्रमाण जास्त आहे. आजही उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार आहे.
सांगली जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. शिवसेना ठाकरे गटातील जिल्हाप्रमुख, पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आज जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत. कट्टर शिवसैनिक व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, युवा सेना प्रमुख यांच्यासह तालुकाप्रमुख, सरपंच आणि ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत.
ठाकरे गटाला मोठं खिंडार
आज 26 मार्च रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या शासकीय निवासस्थानी मुक्तागिरी या बंगल्यावर सायंकाळी पाच वाजता पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. पक्षात पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना योग्य सन्मान मिळत नाही आणि पक्ष वाढीसाठी वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत असल्याने पक्ष सोडत असल्याचे संजय विभूते यांनी भावना बोलून दाखवली. सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे.