इस्लामपूर येथील जिजामाता पेपर मिल्स कंपनीच्या वीज मीटर मध्ये फेरफार करून सुमारे ६ लाख ३८ हजार ३२४ रूपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी कंपनीचे मालक श्रीकांत ज्ञानदेव पाटील (रा. इस्लामपूर) यांना न्यायालयाने ५ लाख ८८ हजार ७७४ रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
जिल्हा न्यायाधीश क्र. १ अचला एच. काशीकर यांनी ही शिक्षा सुनावली.श्रीकांत ज्ञानदेव पाटील यांच्या मालकीच्या जिजामाता पेपर मिल्स कंपनीतील मीटरमध्ये फेरफार करून ३७९५९ केव्ही इतक्या युनिटची सुमारे ६ लाख ३८ हजार ३२४ रूपयांची वीज चोरी केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची जिल्हा न्यायाधीश क्र. १ अचला एच. काशीकर यांच्यासमोर गुणदोषावर सुनावणी झाली.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील राजेश एन. मडके यांनी काम पाहिले. या केसमध्ये ५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये फिर्यादी कार्यकारी अभियंता संतोष कारंडे, उपकार्यकरी अभियंता अनिल मोहिते, राजेंद्र सुर्यवंशी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय माळी, तपासी अंमलदार सचिन स्वामी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. त्यानुसार न्यायालयाने श्रीकांत पाटील यास दोषी धरून ५ लाख ८८ हजार ७७४ रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
दंड न भरल्यावर १० महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली.फायद्याच्या ३ पट ठाेठावला दंडश्रीकांत पाटील याने त्याच्या मीटरची गती ३० टक्के पर्यंत कमी केली होती. व त्यातून लाईटच्या बिलामध्ये ३० टक्के पर्यंत बचत केली. त्यामुळे आरोपीने साधलेल्या फायद्याच्या ३ पट दंड न्यायालयाने ठोठावला.