कोल्हापूर शहरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर आता सांगलीमध्येही (Sangli News) दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. सांगली शहरात वयोवृद्ध दाम्पत्याला कोरोनाची (Corona) लागण झाल्याचे समोर आलं आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटबाबत चर्चा सुरू असतानाच सांगलीतही रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या रुग्णांना कोणत्या व्हेरियंटचा कोरोना आहे याच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येणार आहेत. मनपा क्षेत्रातील वयोवृद्ध पती-पत्नीचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, तर 14 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. राज्यातही काही भागात कोरोना रुग्ण आढळले असल्याने महापालिका क्षेत्रात कोरोना चाचणी सुरू करण्यात आली आहे. यात दोघे कोरोनाबाधित आढळले.सर्दी, ताप असल्याने त्यांची त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यांची प्रकृती चांगली आहे. रुग्णाच्या पत्नीची टेस्ट पोजिटिव्ह आली असली, तरी कोणतेही लक्षणे नाहीत. सध्या याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी आठवडी बाजार, मॉल्स, लग्न समारंभात जाता मास्कचा वापर करावा, कोरोना बचावासाठीच्या नियमांचे पालन करावे, जर कोणाला लक्षणे आढळल्यास त्यांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रमध्ये काही भागात कारोना प्रकारातील जेएन -1 चे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जास्त जाऊ नये, बाहेर फिरत असताना मास्कचा वापर करावा, तसेच सॅनिटायझर्सचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. सांगलीत दोन कोरोना रुग्ण आढळल्याने व राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनास मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील नागरिकानी सतर्क रहावे, लहान मुलांनी व साठ वर्षाखालील नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. गरोदर मातांनी काळजी घ्यावी. बाहेर फिरत असताना सर्वांनी मास्कचा वापर करावा. पॉझिटिव्ह आला असेल तर योग्य ती काळजी घ्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नये, शासकीय आलेल्या माहिती शिवाय कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.