वाळवा तालुक्यातील ट्रक चोरणार्‍या आंतरराज्य टोळीचा छडा, दोघांना अटक

सध्याच्या काळात अनेक गुन्हेगारी क्षेत्रात भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र सर्वानीच पहिले आहे. खून, मारामारी, अवैध्य धंदे यामध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पेठनाका येथील मणिकंडन हॉटेलच्या पार्किंगमधून ट्रक चोरून कर्नाटकात स्क्रॅप करणार्‍या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारासह दोघांना अटक करण्यात आली असून एक पसार आहे. वाळवा तालुक्यातील महादेववाडी येथील सिकंदर पठाण यांच्या मालकीचा मालवाहू ट्रक दि. 24 एप्रिल 2024 रोजी पेठनाका येथील हॉटेल मणिकंडन येथे पार्क केला होता. मध्यरात्री चोरट्यांनी ट्रक चोरून नेला होता. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली होती.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पथकातील कर्मचार्‍यांना सांगली रेल्वे स्थानकावर रेकॉर्डवरील आरोपी असिफ शेख येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने रेल्वे स्थानक परिसरात सापळा लावला. यावेळी आसिफ शेख आणि महाबूबसहाब हकीम या दोघांमध्ये पैशांचा व्यवहार सुरू असल्याचे निदर्शनास आले.

त्यावेळी दोघांना ताब्यात घेऊन शेख यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ 98 हजार रुपये मिळाले. पेठनाका येथील हॉटेलसमोरून ट्रक चोरून हुबळी येथील पंतोजी याला स्क्रॅप करण्यासाठी दिला होता. हकीम हा स्क्रॅप केलेल्या ट्रकचे पैसे देण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. पथकाने दोघांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी इस्लामपूर पोलिसांकडे वर्ग केले.

याप्रकरणी अटक करण्यात आलेला असिफ शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक जयदीप कळेकर, कर्मचारी अनिल ऐनापुरे, संदीप पाटील, गुंडोपंत दोरकर, अमोल ऐदाळे, आमसिद्ध खोत, अनंत कुडाळकर, संकेत कानडे यांच्या पथकाने केली.