इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आम. जयंतराव पाटील यांचा विजय निश्चित; आष्ट्यातील जनता जयंतरावांच्या पाठीशी…..

अडचणीच्या आणि संकटाच्या वेळी आष्टा शहरातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी नेहमीच घेतली आहे. आष्टेकरांना त्यांनी कधीही वाऱ्यावर सोडले नाही. त्यामुळे आष्टा शहरातील जनता आमदार जयंतराव पाटील यांच्या पाठीशी उभी आहे. आष्टा शहरातून आमदार पाटील यांना मोठे मताधिक्य मिळेल, असे प्रतिपादन दिलीपराव वग्याणी यांनी केले. आष्टा येथील अंबाबाई मंदिर परिसर, धनगर गल्ली, मिरजवेस, कदमवेस, सुतार गल्ली, थोटे गल्ली, घोरपडे गल्ली, ज्योतिर्लिंग चौक, हिरुगडे गल्ली आदी परिसरात आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रचार प्रसंगी दिलीपराव वग्याणी बोलत होते.

यावेळी बबनदादा थोटे,  युवानेते कौशिक वग्याणी, विराज शिंदे, संग्राम फडतरे, रामचंद्र सिद्ध, शिवाजीराव चोरमुले, अॅड. अभिजीत वग्याणी, अमित ढोले, मोहन गायकवाड, बाळासाहेब वाडकर, सुनील वाडकर, सयाजी गावडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. दिलीपराव वग्याणी, बबनदादा थोटे यांनी आमदार जयंतराव पाटील यांच्या प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. दिलीपराव वग्याणी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार पाटील हे राज्यातील वजनदार व्यक्तिमत्व आहे. कौशिक वग्याणी म्हणाले, समाजकारण, राजकारण, कृषी,  औद्योगिक, शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू नेतृत्व म्हणून आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता पहात आहेत.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आमदार जयंतराव पाटील साहेब यांनी केले आहे. राजारामबापू उद्योग आणि सहकार समूह त्यांनी आदर्शवत चालवताना महाराष्ट्राला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात त्यांचा विजय निश्चित असला तरी महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.