2 एप्रिल म्हणजेच बुधवारी वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर होणार आहे. आत्तापर्यंतच्या माहितीनुसार, हे विधेयक लोकसभेत दुपारी 12 वाजता सादर होणार आहे. व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत विधेयक सादर करण्याची माहिती देण्यात आली.
लोकसभेत वक्फ विधेयक सादर होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्व लोकसभा खासदारांना उद्या म्हणजेच 2 एप्रिल रोजी संसदेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे. दुसरीकडे, विरोधकांनी या विधेयकावर चर्चेसाठी 12 तासांच्या वेळेची मागणी केली आहे.
‘वक्फ बोर्डामध्ये सुधारणा आवश्यक’
बुधवारी लोकसभेत विधेयक सादर होण्यापूर्वी भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, प्रत्येक चांगल्या कामाला विरोध होतो. वक्फ सुधारणा विधेयकालाही असाच विरोध होत आहे. विरोध करणाऱ्यांना त्यांनी विचारले की, वक्फ बोर्डाने मुस्लिमांचे कल्याण केले आहे का? योगी पुढे म्हणाले की, यामध्ये सुधारणा करणे काळाची गरज आहे. वक्फ बोर्ड हे वैयक्तिक स्वार्थ आणि सरकारी जमिनीवर जबरदस्तीने ताबा मिळवण्याचे साधन बनले आहे.
काँग्रेस मुस्लिमांची दिशाभूल करत आहे: भाजप
वक्फ सुधारणा विधेयकावर भाजप नेते शाहनवाज हुसेन म्हणाले की, वक्फ सुधारणा विधेयकाबाबत गैरसमज निर्माण केले जात आहेत. काँग्रेस आणि इतर पक्ष मुस्लिमांची दिशाभूल करण्याचा आणि त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सीएएबाबत मुस्लिमांची दिशाभूल झाली आणि शाहीनबागमध्ये निदर्शने झाली, तशीच वक्फ कायद्याबाबतही तेच लोक मुस्लिमांची दिशाभूल करत आहेत.
ते म्हणाले की, वक्फ सुधारणा विधेयकात कुठेही मशीद, दर्गा आणि इतर धार्मिक स्थळे सरकार ताब्यात घेईल, असे म्हटलेले नाही. मी हे पूर्ण जबाबदारीने सांगत आहे, त्यामुळे कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. या विधेयकाचा उद्देश केवळ वक्फ मालमत्तेवरील माफियांना एकाधिकारशाही संपवणे हा आहे.