महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित? ठाकरे, पवार की काँग्रेस कोणाला मिळणार किती जागा?

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांकडून जागावाटप, मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे.त्यातच आता महाविकासआघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी आता महायुती आणि महाविकासाआघाडी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गणेशोत्सवानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी मॅरेथॉन बैठक घेतली जाईल. यानुसार विधानसभेच्या २८८ जागांपैकी १०५ जागांची मागणी काँग्रेसने केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने १०० जागा मागितल्या आहेत. तर शरद पवार गटाने ९० जागांची मागणी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकासआघाडीत सध्या जागा वाटपाबद्दल सातत्याने चर्चा होत आहे. यानुसार काँग्रेसने १०० ते १०५ जागांवर लढण्याची तयारी केली आहे. तर शरद पवार गटाने ८५ ते ९० लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासोबतच ठाकरे गटाने ९५ ते १०० जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानंतर महाविकासाआघाडीच्या अनेक बैठका होताना दिसणार आहे. या सर्व बैठका पितृपक्षात होतील. त्यानंतर नवरात्रीपूर्वी किंवा नवरात्रीदरम्यान जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.

त्यासोबत काँग्रेस आणि ठाकरे गटात मुख्यमंत्रिपदावरुन सध्या रस्सीखेच सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते मुख्यमंत्रि‍पदाबद्दल विविध विधाने करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटानेही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण हे लवकर जाहीर करावा असे सांगत आहेत. त्यामुळे याच बैठकांमध्ये मुख्यमंत्रीपदाबद्दलही अंतिम निर्णय घेतला जाईल, असे बोलले जात आहे.