इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाची धावपळ; उपमुख्यमंत्री शिंदे इचलकरंजी दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार ता. ५ रोजी इचलकरंजी दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे हे भेट देवून महानगरपालिकेत आढावा बैठक घेण्यास येणार असल्याने महानगरपालिका प्रशासनाची धावपळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी दरम्यान महानगरपालिकेच्या पदरात काय पडणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागाचा पदभार आहे. महानगरपालिकेचे नगरविकास विभागाकडे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत.

त्यामध्ये कर्मचाऱ्यांची भरती, त्याचबरोबर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या अनेक प्रकल्पासंदर्भात राज्यामार्फत कशा पध्दतीने मदत मिळते यासाठी महानगरपालिकेत आता दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर अधिकारी बैठका घेत आहेत. नाम. शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर इचलकरंजी महानगरपालिकेच्या पदरात काय मिळते याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.इचलकरंजीत झालेल्या कै. भाई नेरूरकर चषक खो-खो स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभासाठी २७ मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे इचलकरंजी दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी महानगरपालिकेस भेट देवून तब्बल एक तास सुरू असलेल्या बैठकीमध्ये विविध कामांचा आढावा घेतला होता.