विठ्ठल चोपडेंच्या उमेदवारीबाबत तर्कवितर्कांना पूर्णविराम!मतदारांना एक चांगला पर्याय मिळाल्याची मतदारसंघात चर्चा सुरू


निवडणूक रिंगणातून अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे हे माघार घेणार, अशी अटकळ बांधण्यात येत होती. पण ती सपशेल फोल ठरवत विठ्ठल चोपडे निवडणूक रिंगणात उतरल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला असून मतदारांना समर्थ पर्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. घराणेशाहीला जनता त्रासली आहे. एकाच कुटुंबाचा स्वतः भोवती केंद्रित राजकारणामुळे मतदार पर्यायी चेहरा शोधत आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी गेल्या पाच वर्षात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही.

सर्वच घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याची भावना कार्यकर्त्यात असल्यामुळे हे कार्यकर्ते त्यांना कितपत सहकार्य करतात, हा प्रश्न आहे. त्यामुळे कोणतीही विधानसभा निवडणुकीची राजकीय पार्श्वभूमी नसलेला, सामान्य पण अभ्यासू उमेदवार अशी ख्याती असलेला एक समर्थ पर्याय विठ्ठल चोपडे यांच्या रूपाने निवडणूक रिंगणात असल्याने मतदारांनाही एक चांगला पर्याय मिळाल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.


विठ्ठल चोपडे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने कार्यकर्त्यात उत्साह आहे. कार्यकर्ते घरोघरी पोहोचून एका नवीन चेहऱ्याला संधी मिळावी, यासाठी धडपडताना दिसत आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर विठ्ठल चोपडे या निवडणुकीत करिष्मा दाखवणार का, याकडे लक्ष लागले आहे. विठ्ठल चोपडे हे मतदार संघातील कोरोची, तारदाळ, खोतवाडी, शहापूर, कबनूर, इचलकरंजी, चंदूर या ठिकाणी जाऊन वैयक्तिक भेटीगाठीवर जोर देत असून प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसत आहे.