इचलकरंजी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जनता सहकारी बँकेचा आर्थिक वर्षात एकूण व्यवसाय ४७०० कोटी इतका झाला आहे. नुकत्याच संपलेल्या २०२४- २५ या आर्थिक वर्षामध्ये बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार व ग्राहक यांचे सहकार्य व विश्वास या बळावर इतका व्यवसाय करण्यात आला आहे. आर्थिक तरतूदीपूर्वीचा नफा रु. ५५ कोटी इतका झाला असल्याचे बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे म्हणाले, चालू आर्थिक वर्षात ५ हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट आहे. एकूण व्यवसायात गतवर्षीपेक्षा ४६९ कोटीची वाढ झाली आहे. बँकेकडे ठेवी २८६२ कोटी इतक्या असून १८४६ कोटीचे कर्ज वाटपाचा समावेश आहे. ठेवीमध्ये ३०८ कोटीची तर कर्ज वाटपात १६० कोटीची वाढ झाली आहे. बँकेचे भागभांडवल रु. ७७.२१ कोटी इतके झाले असून, माजी खासदार व बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनामुळेच बँक आजही प्रेरणादायी प्रगती करत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन धोरणानुसार ५० टक्के कर्ज २५ लाखाच्या आतील करणे बंधनकारक करून, मार्च २०२५ पर्यंत सदरचा कर्जपुरवठा करणेबाबत सूचित केले आहे. या निर्देशाचे बँकेने यथोचित पालन केले असल्याचे सूतोवाच स्वप्निल आवाडे यांनी केले. यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन सीए संजयकुमार अनिगोळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सीए चंद्रकांत चौगुले, संचालक मंडळासह तसेच बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य राजू चव्हाण, योगेश पाटील व सचिन देवरुखकर आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे, जनरल मॅनेजर किरण पाटील, दिपक पाटील, बँकेचे इतर पदाधिकारी, अधिकारी व सेवकवृंद उपस्थित होते.