सांगोला येथे हॉटेलमध्ये जेवायला बोलावून महिलेवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

सांगोला येथे महिलेस स्नॅपचॅट या अॅपवर तरुणाने वारंवार मेसेज करून तसेच पाठलाग करून तू गर्लफ्रेन्ड बनून रहा, नाहीतर आपले मेसेज तुझ्या नवऱ्याला दाखवून बदनामी करेल अशी धमकी देऊन महिलेवर अत्याचार करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत पीडित महिलेने तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ७ फेब्रुवारी २५ ते २ एप्रिल २५ दरम्यान रितेश सीताराम जाधव याने फिर्यादी महिलेस स्नॅपचॅट या अॅपवर बारंबार मेसेज करून तसेच सांगोला येथे गेल्यानंतर महिलेचा पाठलाग करून तू माझ्याशी बोल आणि माझी गर्लफ्रेंड बनून रहा, नाहीतर मी आपले मेसेज तुझ्या नवऱ्याला दाखवेल व तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली.

तसेच फिर्यादीस सांगोला शहरातील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी बोलावून तू माझी गर्लफ्रेंड आहेस व माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपले मेसेज तुझ्या नवऱ्यास दाखवेल व तुझ्या मुलांना मारून टाकीन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर मी तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.