पारगाव येथे वृद्धाचे पावणेतीन लाखांचे दागिने लंपास; एक्साईज कर्मचारी असल्याचे भासवले

हातकणंगले तालुक्यातील पारगावच्या पाडळी रोडवर राहणारे महादेव पोवार हे सेवानिवृत्त आहेत. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ते पारगाव येथील दत्त पतसंस्थेजवळ थांबले होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी पवार यांना दरडावत चोऱ्या होत आहेत अंगठी चेन का घालून फिरत आहात असे विचारत अंगावरील दागिने काढून खिशात ठेवा असे सांगितले.

पवार यांना मदत करण्याचा बहाणा करत पवार यांच्या गळ्यातील ३५ ग्रॅमचा सोन्याचा गोफ व पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी हातरूमालात बांधून ठेवल्याचा बहाणा करत रुमालात खोटा गोफ ठेवत खरे सोने हातोहत लंपास केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवार व त्यांच्या नातेवाईकांनी वडगाव पोलिसांत धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण सरगर तपास करत आहेत.