इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयाचा राज्यात चौथा क्रमांक; शासनाकडून मिळणाऱ्या सुविधावर शिक्कामोर्तब

राज्य शासनाच्या शासकीय रुग्णालयामध्ये मिळणाऱ्या सोयी-सवलती संदर्भात मासिक रैंकिंग प्रणाली लागू केली आहे. त्यामध्ये येथील इंदिरा गांधी सर्वसामान्य रुग्णालयाने राज्यात चौथा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे या रुग्णालयातील मिळणाऱ्या सुविधावर शासनाने शिक्का मोर्तब केला आहे. आरोग्य सेवा संचालक, आयुक्तालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार राज्यातील जिल्हा, सामान्य आणि उपजिल्हा रुग्णालयांची मासिक रँकिंग प्रणाली लागू करण्यात आली.

फेब्रुवारी २०२५ या महिन्याचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या मासिक रँकिंगमध्ये येथील आयजीएम सामान्य रुग्णालयाने उल्लेखनीय यश मिळवले असून, ६७ गुणांसह चौथ्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. या यशामुळे आयजीएम रुग्णालय टॉप फाईव्हमध्ये स्थान मिळवणारे अग्रगण्य रुग्णालय ठरले आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमधील विविध निर्देशकांवर आधारित या रँकिंगमध्ये रुग्णसेवा, स्वच्छता, वेळेवर उपचार, तपासणी व्यवस्था आदी घटकांचा विचार करण्यात आला होता.

रुग्णसेवेत सातत्याने सुधारणा करत असलेल्या आयजीएम रुग्णालयाच्या या कामगिरीमुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, रुग्णालय प्रशासन व कर्मचारी वर्गाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आगामी काळात आणखी दर्जेदार सेवा देण्यासाठी रुग्णालय सज्ज असल्याचेही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.