सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड याच्यासह त्याच्या साथीदारांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करत इचलकरंजी, शिरोळ, शाहूवाडी, पन्हाळा येथील शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. इचलकरंजी येथील आंदोलनात जिल्हा शिवसेना प्रमुख रविंद्र माने यांनी सदरचा खटला फास्ट ट्रैक न्यायालयात चालवावा, अशी मागणी करत या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. महात्मा गांधी पुतळा येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी वाल्मिक कराडच्या पोस्टरला जोडे मारुन आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
दरम्यान, हुपरी येथे युवा सेनेतर्फे शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाल्मिकी कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख विजयकुमार स्वामी, तालुकाप्रमुख अजित सुतार, शहर प्रमुख नितीन गायकवाड, बाळासाहेब मुधाळे, राजेंद्र पाटील, अरुण गायकवाड, शरद पाटील आदी सहभागी झाले होते. तर पन्हाळा येथे तालुका प्रमुख दादासो तावडे, दिप्ती कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तर शिरोळ येथे उपजिल्हाप्रमुख सतिश मलमे, प्रा. चंद्रकांत मोरे, युवा सेनाप्रमुख राकेश खोंद्रे, उदय झुटाळ, गणेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करुन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आले.. एकुणच आजच्या आंदोलनात शिवसेना कमालीची आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.