आयपीएल 2025 चा हंगाम सध्या सुरु आहे. आतापर्यंत 39 सामने खेळवण्यात आले आहेत. मात्र याचदरम्यान राजस्थान रॉयल्सवर धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायट्स यांच्यात 19 एप्रिल रोजी खेळवण्यात आलेला सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशन (आरसीए) च्या एड-हॉक समितीचे संयोजक जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्सवर ‘मॅच फिक्सिंग’चा आरोप केला आहे.
181च्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघ चांगल्या स्थितीत दिसत होता. पण, लखनौचा वेगवान गोलंदाज आवेश खानने शेवटच्या षटकांमध्ये सामना आपल्या संघाच्या बाजूने वळवला. या सामन्यात राजस्थानला 2 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता याच सामन्यावर प्रश्न उपस्थित करत जयदीप बिहानी यांनी ‘मॅच फिक्सिंग’चा आरोप केला आहे. लखनौविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त नऊ धावा हव्या असताना तुम्ही सामना (match) कसा गमावता? असा सवाल बिहानींनी विचारला आहे. ज्या पद्धतीने या सामन्याचा निर्णय लागला ते पाहता हा सामना फिक्स होता हे छोट्या मुलालाही समजेल, असं बिहानी म्हणालेत. जयदीप बिहानी मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि पराभवावर शंका घेतली आहे. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सच्या कारभारावर सरकारने नियुक्त केलेल्या अॅड-हॉक समितीचे नियंत्रण का नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. दरम्यान, विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी मॅच फिक्सिंग प्रकरणामध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांवर आयपीएलच्या शिस्त पालन समितीने 2 वर्षांची बंदी घातली होती.
शेवटच्या षटकांत काय घडलेलं?, नेमके आरोप काय?
शेवटच्या षटकात राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 9 धावांची आवश्यकता होती. लखनौ सुपर जायंट्सचा अवेश खान गोलंदाजी करत होता. राजस्थानचा फलंदाज ध्रुव जुरेल स्ट्राईकवर होता आणि शिमरॉन हेटमायर नॉन-स्ट्रायकर एंडवर होता. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेल्या आवेश खानने भेदक गोलंदाजी करत यॉर्करचा वापर केला. शेवटच्या षटकात आवेश खानने फक्त 6 धावा दिल्या आणि लखनौने सामना (match) 2 धावांनी जिंकला. जयदीप बिहानी गेल्या काही काळापासून राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेट कारभाराविरुद्ध आवाज उठवत आहेत. जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्सच्या आयपीएल कारभारापासून राज्य संघटनेच्या एड-हॉक समितीला दूर ठेवण्याच्या क्रीडा परिषदेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जयदीप बिहानी म्हणतात की, राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीला आयपीएलच्या बाबींपासून दूर ठेवणे योग्य नाही. जेव्हा समिती कोणत्याही अडचणीशिवाय सर्व स्पर्धा आयोजित करते, तेव्हा आयपीएलच्या बाबतीत ते का बाजूला ठेवले जातेय?, असा सवाल जयदीप बिहानी यांनी उपस्थित केला. राजस्थान रॉयल्सकडून सांगण्यात येतंय की, सवाई मानसिंग स्टेडियमशी सामंजस्य करार नाही. परंतु, कोणताही सामंजस्य करार नसला तरीही, आरआर प्रत्येक सामन्यासाठी जिल्हा परिषदेला पैसे देत आहे. अशा परिस्थितीत, सामंजस्य कराराचा मुद्दा का उपस्थित केला जात आहे? बिहानीच्या या आरोपांमुळे राजस्थान रॉयल्स आणि आयपीएलच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता या आरोपांना राजस्थान रॉयल्स आणि बीसीसीआय काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.