शार्दूलला होमग्राऊण्डवरच का वगळलं?

आयपीएलचा नवा मोसम सुरू असताना प्रमुख वेगवान गोलंदाज जायबंदी झाल्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सने ऐनवेळी शार्दूल ठाकूरला करारबद्ध केले. शार्दूलने (Shardul) निवड सार्थ ठरवताना ११ फलंदाजही बाद केले आहेत. त्यानंतरही त्याला रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यांत वगळण्यात आले. ‘शार्दूलला वगळण्याचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला होता’, असे उदगार ‘लखनऊ’ संघाचे मेंटॉर झहीर खान यांनी सामन्यानंतर केले.

शार्दूल ठाकूरला वगळल्यामुळे धक्का

शार्दूल (Shardul) हा मुंबई रणजी संघातील प्रमुख गोलंदाज आहे. वानखेडे स्टेडियम हे त्याचे ‘होम ग्राऊंड’ आहे. त्यानंतरही त्याला वगळण्यात आल्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. ‘शार्दूलने या स्पर्धेत खूपच प्रभावी कामगिरी केली होती. त्याने आमच्या आशा कायम ठेवण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. मात्र लीग सुरू असतानाही काहीवेळा प्रशिक्षणाची गरज असते. त्याचबरोबर ही दीर्घवेळ चालणारी लीग आहे. त्या दरम्यान खेळाडूंना योग्यवेळी विश्रांती देणेही आवश्यक असते.’असे झहीरचे म्हणणे आहे.

म्हणून शार्दूलच्या विश्रांतीला महत्त्व

‘लीगमधील महत्त्वाचा अंतिम टप्पा लक्षात घेऊन सध्या शार्दूलच्या प्रशिक्षणास आणि विश्रांतीस महत्त्व देण्याचे ठरवले. त्याचबरोबर मयंक यादवचा संघात पुनरागमन करण्यासाठी ही योग्य वेळ आहे हाही आम्ही विचार केला’, असे सांगत झहीर यांनी शार्दूलऐवजी मयंकची निवड करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.