व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाकडून आयटीआय’ प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. सध्या राज्यात ‘आयटीआय’ प्रवेशासाठी दीड लाख जागा उपलब्ध असून, सहा नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. विद्यार्थी आणि पालकांनी ‘डीव्हीईटी’च्या वेबसाइटवर भेट देण्याचे आवाहन ‘डीव्हीईटी’कडून करण्यात आले आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, अकरावी, डिप्लोमा आणि ‘आयटीआय’ प्रवेश प्रक्रिया वेग धरणार आहेत. येत्या आठवड्यात तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियामध्ये नोंदणी प्रकिया सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कागदपत्रे आणि दाखले काढून ठेवावे, अशी माहिती देण्यात आली आहे. दहावीच्या निकालात १.७१ टक्क्यांची घट झाल्याने यंदा प्रवेशासाठी फारशी अडचण येणार नाही. मात्र, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर येथील नामांकित संस्थेत प्रवेशासाठी चुरस राहणार आहे.
राज्यातील यंदा सर्व ज्युनिअर कॉलेजांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना येत्या १९ मेपासून ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. सध्या कॉलेजांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in ही स्वतंत्र वेबसाइट कार्यन्वित केली आहे. राज्यातील जवळपास ११ हजार ७०० ज्युनिअर कॉलेजांमधील अकरावीच्या सुमारे १६ लाख ७६ हजार जागांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याद्वारे अकरावीच्या प्रवेशासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे ऑनलाइन नोंदणीद्वारे ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. यंदा विद्यार्थ्यांना एका अर्जातच विविध भागांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यांच्या देखरेखीखाली संबंधित जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. याशिवाय विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे.
पॉलिटेक्निक प्रवेश १९पासून
राज्यातील डिप्लोमा इन इंजिनीअरिंग प्रवेशांना दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरुवात होते. यंदा निकाल लवकर जाहीर झाला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या दिवशीच पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा मानस आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे. राज्यात ३५० पॉलिटेक्निकमध्ये एक लाख सात हजार जागा प्रवेशासाठी आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी माहितीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर संपर्क साधावा, असे आवाहन संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी केले आहे.