अपार्टमेंटमध्ये वीज जोडणी देण्यासाठी ९० हजार रुपयांची मागणी करुन ३० हजार रुपयांची लाच स्विकारताना येथील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत ताराचंदजी राठी (वय ४९ रा. उपकार रेसिडेन्सी सांगली रोड) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी रंगेहात पकडले. स्टेशन रोडवरील महावितरणच्या कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली.
कारवाईनंतर फटाके फोडले महावितरण विभागातील भ्रष्ट कारभाराने त्रस्त झालेल्या काही मंडळींनी कारवाई झाल्याचे समजल्यानंतर चक्क महावितरणच्या प्रवेशद्वारातच फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. याबाबत मिळालेली माहिती अशी, इलेक्ट्रीक कॉन्ट्रॅक्टर असलेल्या तक्रारदाराने शहरातील एका अपार्टमेंटमधील १८ फ्लॅटमध्ये वीज जोडणीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात दिली होती. हा अर्ज मंजूर करण्यासाठी तक्रारदार हा कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना भेटला असता राठी यांनी १८ प्लॅटचे प्रत्येकी ५ हजार रुपयेप्रमाणे ९० हजार रुपये दिल्यास प्रकरण मंजूर होईल असे सांगत लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत तक्रार दिली होती.
तक्रारीची पडताळणी केली असता राठी यांनी ९० हजाराच्या मागणीस दुजोरा देत तडजोडीअंती ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत मंगळवारी दुपारच्या सुमारास राठी यांना ३० हजाराची लाच स्विकारताना ताब्यात घेतले. राठी यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या राठी यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक वैष्णवी पाटील, सहा. फौजदार प्रकाश भंडारे, पोहेकॉ विकास माने, संदीप काशीद, सचिन पाटील, उदय पाटील, गजानन कुराडे, प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली.
