40 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत होणार; कोकणातील महत्त्वाचा घाट वाहतुकीसाठी खुला

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्यात 15 मे रोजी वीजपुरवठा सुरू झाल्याने तो पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित झाला आहे. हा घाट बोगदा हा दोन किलोमीटर लांबीचा असून, त्याला जोडणाऱ्या रस्त्यांसह संपूर्ण मार्ग सुमारे नऊ किलोमीटरचा आहे.

कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यांतील अंतर्गत गळती दुरुस्त करण्याचे काम सुरू असून 15 मेपूर्वी वाहतुकीसाठी ते पूर्ण क्षमतेने खुले करण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यादृष्टीने बोगद्याचे काम सुरू होते. आता अखेर बोगद्यातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. या बोगद्यामुळं 40 ते 45 मिनिटांचा वळसा वाचून अवघ्या 10 ते 15 मिनिटांत रायगडमधील पोलादपूर ते रत्नागिरीतील खेडमधील कशेडीपर्यंतचा प्रवास शक्य होत आहे.

बोगद्यात दोन्ही बाजूंनी २०० पथदीपांची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. या पैकी बहुतांशी काम पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत प्रवास अधिक सुकर होणार आहे. आता मुंबईकडे येणाऱ्या बोगद्याप्रमाणेच रत्नागिरीकडे जाणाऱ्या बोगद्यातही वीज यंत्रणा सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुसाट असा होणार आहे.