हिवरे येथील सहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा खून


हिवरे ता. कोरेगाव येथे इयत्ता ६ वी मध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा खून केल्याची घटना घडली, विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ वय १२ असे मृत मुलाचे नाव आहे. धक्कादायक घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मृत – विक्रम खताळ वाठार पोलीस व घटनास्थळावरून मिळाल ेल्या माहितीनुसार शनिवार दि. २३ डिसेंबर रोजी विक्रम व त्याचे आई वडील हिवरे येथील कुंभारकी नावाच्या शिवारात त्यांचे उसाचे क्षेत्र असून शेतामध्ये जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान विक्रम याची आई घरी गेली व विक्रम व त्याचे वडील पाठीमागून एक तासानंतर घराच्या दिशेने जात असताना विक्रमची चप्पल शेतात राहिल्याचे विक्रमच्या लक्षात आले.

यावेळी तो वडिलांना सांगून चप्पल आणण्यासाठी पुन्हा शेतात आला. मुलगा घरी न आल्याने त्याच्या आईने त्याची गावात शोधाशोध केली या वेळी तो मिळून न आल्याने सायंकाळी ७ वाजता गावातील नितीन खताळ यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे फोन करून गावातील लोकांना विक्रम बेपत्ता असल्याचे सांगितले. या फोन मुळे गावातील सर्व ग्रामस्थ व युवक एकत्र आले यावेळी परिसरात बिबट्याची दहशत असल्याने त्या अनुषंगाने जमलेल्या सर्व लोकांनी कवडेवाडी शिवार व कुंभारकी शिवारात त्याची शोध शोध केली तरीही तो मिळून आला नाही.

त्यानंतर काही युवकांनी त्यांच्या कुंभारकी येथील उसाच्या शेतात प्रत्येक सरित शिरून त्याचा शोध घेतला असता एका सरीत उसाच्या पाचोट्याने झाकून ठेवलेला विक्रम याचा मृतदेह सापडला. घटनेचे माहिती वाठार पोलिसांना मिळताच वाठार पोलीस, श्वान पथक, ठसे तज्ञ, तपास यंत्रणा, कोरेगाव पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके घटनास्थळी हजर झाले. यावेळी विक्रम याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. सदर घटनेची फिर्याद विजय आनंदराव खताळ वय ३६ यांनी वाठार पोलीसात दिली असून वाठार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले करीत आहेत.