नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य खरेदी करणाऱ्यांना एक दिवसाचा परवाना बंधनकारक केला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये एक लाख परवाने ठेवण्यात आले आहेत.
विनापरवाना कोठेही बसून मद्यपान करणे, ढाब्यांवरील मद्यपान, हातभट्टी दारूची विक्री, अशा बाबींमुळे संबंधितांवर गुन्हा दाखल होतो. नवीन वर्षाच्या सुरवातीला कोणाविरुद्धही गुन्हा दाखल होणार नाही, याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे. त्यासाठी अधीक्षक नितीन धार्मिक यांनी मद्यपान करणाऱ्यांनी एक दिवसाचा परवाना घ्यावा, असे आवाहन केले आहे. देशी दारूसाठी एक दिवसाच्या परवान्याला दोन रुपये तर विदेशी दारूसाठी पाच रुपयांचे शुल्क असते.
मद्यविक्रीच्या दुकानांमध्ये हा परवाना उपलब्ध करून देण्यात आला आहे. दारू खरेदी करून जाणाऱ्याकडे परवाना नसल्यास त्याच्याविरुद्धही कारवाई होवू शकते, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. जिल्ह्यातील हातभट्ट्यांवरही स्थानिक पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचा वॉच आहे. ३० डिसेंबरपासूनच अवैध मद्य वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके असणार आहेत.
विदेशी दारूची वाहतूक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होते. त्यावरही विशेष लक्ष असणार आहे. दारू विकत घेतली म्हणून कोठेही पिता येत नाही. दुसरीकडे मद्य खरेदी करणाऱ्यांकडे मद्यपानाचा परवाना बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई व गुन्हा दाखल होणार आहे.
जिल्ह्यातील मद्यविक्री दुकाने…
देशी दारू दुकाने ११५
वाइन शॉप ४२
परमीट रूम ५८५
बिअर शॉपी २५०
नववर्षाच्या निमित्ताने ज्यांना पार्टी करायची आहे, त्या प्रत्येकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एक दिवसाचा वन-डे क्लब परवाना घ्यावा लागणार आहे. इच्छुक अर्जदारांना आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
त्यानंतर संबंधितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वेबसाइट https://exciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा लागेल. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सहा पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक निरीक्षक, दोन दुय्यम निरीक्षक, तीन जवान, एक सहायक दुय्यम निरीक्षक, एक वाहन चालक, असे मनुष्यबळ असणार आहे.