मी आणि अजित घरात एकत्रच, शरद पवारांच्या विधानाने उंचावल्‍या सर्वांच्याच भुवया

राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा रणसंग्राम तोंडावर असताना आता युती आणि आघाडी समोरासमोर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातील चिपळूण येथे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा घेतली.तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मोठी जाहीर सभा झाली. या निमित्ताने खासदार शरद पवार चिपळूणमध्ये दाखल झाले होते.

यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ‘घरात आम्ही एकत्रच….’ असा उच्चार करून राजकीय गोठात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या व्यक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्‍या आहेत. त्यामुळे आता राजकारण तापणार आहे.

दिवसेंदिवस राजकीय समीकरणे बदलत असून या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. चिपळूण मधील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी काका – पुतणे एकत्र येणार का ? असा खोचक सवाल केला. त्यावर उत्तर देताना खासदार शरद पवार यांनी ‘घरात आम्ही एकत्रच आहोत…’असे मिश्किल शब्दात उत्तर दिले आणि अधिक बोलणे टाळले.